मंगेश पाडगावकर हे नाव मराठी काव्यविश्वातले एक मातब्बर नाव आहे. मराठी कवितेच्या सौंदर्यवादी परंपरेचे उल्लसित करणारे दर्शन त्यांच्या कवितेतून घडते. कवितेची एकाग्र साधना त्यांनी दीर्घकाळ चालविली आहे. निसर्ग चैतन्याची रसरशीत, मोहक आणि विविध रूपे प्रक.
करणारी त्यांची प्रारंभ काळातील कविता हळूहळू जीवनातील भावचैतन्याचा शोध घेण्यात रमली. माणसाच्या मूल्यसंचिताचा आणि भावसंचिताचा क्षय घडवणार्या अमंगलाला, भयाला, कुरूपतेला जन्म देणार्या वास्तवाचा मागोवा घेत जीवनाच्या विधायक शक्यता शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या प्रयत्नांत समकालीन जीवनाचे स्वरूप उलगडत असताना कवितेची बहुसाळ दर्शनेही त्यांना होत राहिली.
अभिव्यक्तीचे वेगवेगळे मार्ग त्यांनी शोधून पाहिले. पाडगावकरांच्या या वैचित्र्यपूर्ण निर्मितीचे आणि प्रेरणाक्षेत्राचे रूपदर्शन घडवणारा हा आस्वादक शोध आहे.