Skip to product information
1 of 1

Amitabh Shahenshaha By Babu Moshay

Description

अमिताभचे परिपूर्ण आणि वाचनीय चरित्रहिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अमिताभ बच्चनला जेवढी लोकप्रियता मिळाली, तेवढी अन्य कुणालाही मिळालेली नाही. सत्तरीच्या दशकात त्याला ‘सुपरस्टार’ म्हणून लाभलेलं बिरुद आजही टिकून आहे. समाजातील सर्व स्तरांवरील आबालवृद्धांना तो हवाहवासा वाटतो. दूरदर्शनवरील ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रम त्यातील नावीन्य ओसरल्यानंतर, म्हणजे तीन-चार महिन्यांनंतर, प्रेक्षकांना पाहवला नसता. केवळ अमिताभच्या चित्ताकर्षक सूत्रसंचालनामुळे एक-दीड वर्षांनंतरही तो सुसह्य होतो. अमिताभसमोर ‘हॉट सीट’वर बसणारा स्पर्धक आणि ‘फोन अ फ्रेंड’ला प्रतिसाद देणारी दुसर्‍या बाजूची व्यक्ती अमिताभच्या उपस्थितीमुळे किती भारावून गेलेली असतात, हे पाहण्यासारखं असतं! बीबीसीनं ‘सहस्रकातील अभिनेता’ असा नुकताच ज्याचा गौरव केला, त्या शहेनशहा अमिताभचं विस्तृत चरित्र बाबू मोशायनी शद्बबद्ध केलं आहे. ‘आनंद, मैं तुम्हे मरने नही दुंगा - आनंद, तुम मर नही सकते’, असं विद्ध स्वरांत आनंदला बजावणार्‍या बाबू मोशायची अप्रतिम भूमिका अमिताभनं त्याच्या प्रारंभीच्या काळात ‘आनंद’ चित्रपटात केली होती. त्या भूमिकेच्या प्रेमात पडून ‘शहेनशहा अमिताभ’च्या लेखकानं ‘बाबू मोशाय’ हे टोपण नाव घेतलं असावं. बाबू मोशायनी चित्रपटाच्या विविध अंगांवर आतापर्यंत असंख्य अभ्यासपूर्ण लेख लिहिले आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘चित्राची गोष्ट’ या ग्रंथात मूकपटाच्या जमान्यापासून विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत चित्रपट माध्यमाची कशी वाटचाल झाली, याचा तपशीलवार आढावा घेण्यात आला आहे. तो वाचल्यावर बाबू मोशाय यांची या माध्यमाविषयीची जाण किती सूक्ष्म आहे, याचा प्रत्यय येतो. पाश्चात्य आणि बंगाली चित्रपटांचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. त्यांचं वाचन चौफेर आहे आणि वृत्ती चिकित्सक आहे. हिंदी काव्य, मराठी नाटकं, राजकारण, समाजकारण, अर्थकारण अशा विविध विषयांसंबंधीचं ज्ञान पक्कं आहे. परिणामी, अमिताभच्या चित्रपटांचं, त्यातील त्यांच्या भूमिकांचं विश्लेषण करून ते थांबत नाहीत. हरिवंशराय व तेजी बच्चन या माता-पित्यांनी त्याचं लालनपालन कसं केलं, त्याच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी होत गेली, त्याच्यावर कशा प्रकारचे संस्कार झाले, यासंबंधीचा बारीकसारीक तपशील बाबू मोशाय पुरवतात. अमिताभची उमेदवारीच्या काळातील धडपड, त्याची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीचा भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास, त्याच्या समकालीन चित्रपटांचं स्वरूप, त्याचा पडता काळ याचं सखोल, साधार चित्रण लेखकानं केलं आहे. हिंदी सिनेमांत गाजलेल्या यच्चयावत अभिनेत्यांशी चरित्रनायकाची तुलना लेखकानं केली आहेच. त्याही पलीकडे जाऊन हंफ्रे बोगार्ट, क्लार्क गेबल, लॉरेन्स ऑलिव्हिए, डस्टिन हॉफमन यासारख्या बुजुर्गांच्या अभिनयपद्धतीशी अमिताभची तुलना करून लेखकानं त्याच्या अभिनयाची इयत्ता निश्चित केली आहे. परिणामी, लेखनाला अनेक डायमेन्शन्स प्राप्त झाली आहेत. तसं पाहिलं तर दस्तुरखुद्द अमिताभचं आयुष्य विलक्षण रोमहर्षक आहे. सलीम जावेदना सहजासहजी सुचणार नाहीत अशा चित्तचक्षुचमत्कारिक घटना आजपर्यंतच्या त्याच्या जीवनप्रवासात घडून गेल्या आहेत. घरचं साहित्यिक वातावरण, नैनितालला घेतलेलं शिक्षण, नेहरू-गांधी घराण्याशी असलेले जिव्हाळयाचे संबंध, कलकत्त्याची सामान्य नोकरी, चेहरा पारंपरिक फिल्मी हिरोचा नसूनही चंदेरी दुनियेत नायक म्हणून चमकण्याची ईर्ष्या, ‘जंजीर’ला लाभलेलं प्रचंड यश, ‘सुपरस्टार’ म्हणून मिळालेली अमाप लोकप्रियता, राजकारणातील अपयश, ‘कूली’च्या चित्रिकरणावेळी झालेला भीषण अपघात, ए. बी. सी. एल. गाळात जात असताना त्याच्या कारकीर्दीचा सुरू झालेला उतार आणि ‘कौ. ब. क.’मुळे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे त्याला लाभलेला पुनर्जन्म... अशा या वादळी व भन्नाट जीवनाचा आलेख बाबू मोशायनी मोठया कौशल्यानं चितारला आहे. चित्रपटविषयाशी संबंधित असलेलं बहुतेक लेखन वरवरचं, उथळ शैलीतील असतं; ‘गॉसिप’वर भर देणारं; चुरचुरीत, करमणूकप्रधान मजकूर वाचकाला आवडतो या गैरसमजापोटी लिहिलेलं असतं. बाबू मोशाय यांचं लेखन अभ्यासपूर्ण, तलस्पर्शी आणि प्रत्येक विषयाच्या सर्व बाजूंची सांगोपांग दखल घेणारं आहे. निखळ गांभीर्यांनं लिहिलेलं हे चरित्र अथपासून इतिपर्यंत वाचनीय झालं आहे. हे नि:संशय. ‘जंजीर’ सुपरहिट झाल्यानंतर ‘दीवार’, ‘शोले’, ‘डॉन’ यासारख्या अनेक चित्रपटांनी इतिहास घडवला. अमिताभची ‘अॅंग्री यंग मॅन’ची प्रतिमा निर्माण झाली. त्याच्या आक्रमक व्यक्तिमत्त्वाला कमालीची लोकप्रियता लाभली. हिंसेला हिसेनं, शस्त्राला शस्त्रानं उत्तर द्यावं, न्याय मिळावा; अन्यायाचं परिमार्जन व्हावं यासाठी मन:पूत हिंसाचार क्षम्य मानावा, अशी विचारसरणी अमिताभयुगात फोफावली. अर्धशिक्षित तरुणांच्या अर्ध कच्या मनानं या विचारसरणीचं आपल्याला सोयीस्कर असं तत्त्वज्ञान निर्माण केलं. या संदर्भात बाबू मोशायनी हिंदी चित्रपटसृष्टीतील बदलत्या प्रवाहाचं केलेलं विश्लेषण महत्त्वाचं आहे. अमिताभचं बंडखोर युग सुरू झाल्यानंतर सैगल, दिलीपकुमार, राजेश खन्ना यांचं हळुवार युग संपलं. हिंसाचाराला नैतिक अधिष्ठान प्राप्त करून देणारे हिंदी चित्रपट एकामागोमाग एक येऊ लागले. गुन्हेगार मंडळी उजळ माथ्यानं समाजात वावरू लागली. राजकारणाचं झपाटयानं गुन्हेगारीकरण झालं. तुरुंगात खितपत पडलेले गुन्हेगार प्रचंड मतांनी निवडून येऊ लागले. खून, कत्तली, रक्तमांसाचा सडा याविषयी माणसाच्या मनात उपजत असलेली घृणा कमी झाली. टीव्हीमुळे चित्रपट घरोघरी पोचले आणि त्यांचा सामाजिक मनोवृत्तीएवर विपरीत परिणाम झाला. अमिताभच्या अभिनयगुणांचे, घनगंभीर आवाजाचे कौतुक करत असताना त्याच्या वृत्ती-प्रवृत्तींमधील दोषही बाबू मोशाय अधोरेखित करतात. एकदा विशिष्ट प्रकारचे चित्रपट चालतात, याची खात्री झाल्यावर तो त्याच प्रकारचे चित्रपट करू लागला. तो एका विशिष्ट कक्षेतच भ्रमण करत राहिला. कमल हसनप्रमाणं त्यानं वेगळी वाट चोखाळण्याचं टाळलं. बाबू मोशाय म्हणतात, ‘त्याच्या बोलण्यातून चाकोरीबाहेरील चित्रपटांबद्दलची तुच्छता सदैव व्यक्त होत असते. म्हणजे व्यावसायिक असो वा कलात्मक चित्रपट असो, त्यामधील प्रायोगिकतेपासून अमिताभ दूरच राहिला. तो वहिवाटेनेच चालत राहिला, त्याने बिकट वाटेकडे ढुंकूनही कधी पाहिले नाही.’ तो एक कलात्मक व्यापारी आहे, असं बाबू मोशाय यांचं निरीक्षण आहे. आर्थिक लाभ मिळतात म्हणून त्यानं आपण अनिवासी भारतीय असल्याचं बेदिक्कत जाहीर केलं! मैं गाऊं तो मेरा कंठ स्वर न दबे औरों के स्वर से, जीऊं तो मेरे जीवन की औरोंसे हो अलग खानी| असा हट्ट धरणार्‍या हरिवंशरायांच्या चिरंजीवांकडून समाजानं वेगळी अपेक्षा का धरू नये? काही असो; अभिनयातील सूक्ष्म छटा, खुब्या, हावभाव, वैशिष्टयपूर्ण ढंग याबाबतीत अमिताभचा हात धरणारा कुणी नाही. तो बुद्धिमान आहे आणि म्हणूनच तो आपल्या वाटयाला आलेल्या व्यक्तिरेखेचा चहुअंगांनी विचार करू शकतो. बाबू मोशाय नमूद करतात, ‘त्याच्यासारखे व्हॉइस मॉडयुलेशन कोणालाच जमले नाही... त्याचा स्वर जखमा करतो, घायाळ करतो आणि अंगारही फुलवतो. त्या आवाजाला उंची आहे, एक परिमाण आहे, चढउतार आहेत, त्यामध्ये वेदना सोसण्याची आणि वेदना देण्याची ताकद आहे.’ अशा आकर्षक शैलीत सहस्रकातील सर्वश्रेष्ठ चित्रपट कलाकाराचं सामर्थ्य आणि मर्यादा उलगडून दाखविणारं हे चरित्र सर्वांग परिपूर्ण झालेल आहे, यात संदेह नाही. पुस्तकात भरपूर छायाचित्रं आहेत. एक त्रुटी जाणवली. पुस्तकाच्या शेवटी अमिताभच्या आजपर्यंतच्या सर्व चित्रपटांची यादी असायला हवी होती. पुढील आवृत्तीत ते करता येईल. पुस्तकाची निर्मितीमूल्यं ‘राजहंस’च्या लौकिकास शोभतील अशीच आहेत
Regular price
Rs. 350.00
Regular price
Rs. 0.00
Sale price
Rs. 350.00
-0%
Language: Marathi
Amitabh Shahenshaha By Babu Moshay  Half Price Books India Books inspire-bookspace.myshopify.com Half Price Books India
Amitabh Shahenshaha By Babu Moshay

Recently viewed product

You may also like