बालपणीच्या नीलरंगी विश्वामध्ये पुन्हा एकदा रमून गेलेल्या आर.के.लक्ष्मण यांना भुताच्या गोष्टी सांगून त्यांची भंबेरी उडवणारा माळीबुवा आठवतोय. तर एम.एस.सुब्बलक्ष्मींच्या आठवणींना चिंच, मिरच्या आणि मीठ कुटून त्याच्या छोटयाछोटया गोळ्यांना काडया खुपसून बनवलेल्या कँडीची आंबटगोड चव आहे. या पुस्तकामध्ये सहा कलावंत आपल्या शैशवातील आठवणींना उजाळा देत आहेत. मोठेपणी ज्या कलाक्षेत्रात विपुल यश कमावलं त्या कलेविषयी गोडी कशी निर्माण झाली याचं हृदगत ते तुम्हाला सांगत आहेत. केलुचरण महापात्रांनी नृत्याचे धडे घ्यायला सुरुवात केली तीच मुळी मुलीच्या वेषामध्ये, तर हुसेननी आपली चित्रकारी प्रथम आजमावली ती सिनेमाच्या पोस्टरवर! तेंडुलकरांचे शिक्षकच वर्गात आपण पाहिलेल्या चित्रपटांच्या गोष्टी रंगवून सांगत, अमजद अली खान सरोदवर चित्रपटगीतं वाजवून आपल्या वर्गमित्रांना खूष करत. या विख्यात कलाकारांच्या बालपणीची वर्णनं वाचून तुमच्या देखील मनात विचार आल्याशिवाय राहणार नाही, ‘‘अरे, मीही ह्या सर्वांपेक्षा फारसा वेगळा नाही. कदाचित मलादेखील जमेल की…’’