‘मी आल्फ्रेड बर्नाड नोबेल संपूर्ण विचारांती खालीलप्रमाणे माझे अंतिम मृत्युपत्र घोषित करीत आहे. सत्यतेची खूण असणार्या या कायदेशीर कागदपत्रांनुसार माझ्या मुत्यूनंतर मागे राहिलेल्या संपत्तीचा विनियोग व्हावा.विश्वस्तांनी मूळ रक्कम सुरक्षित अशा कायमस्वरूपी निधीच्या स्वरूपात ठेवावी. या ठेवीवर मिळणार्या व्याजाची रक्कम दरवर्षी उच्च दर्जाच्या मानवतावादी काम केलेल्या व्यक्तीला अथवा संस्थेला पुरस्काराच्या स्वरूपात बहाल करण्यात यावी.हा पुरस्कार बहाल केल्या जाणार्या व्यक्ती वा संस्थेच्या राष्ट्रीयत्वाविषयी कुठलाही किंतु मनात न बाळगता उचित व्यक्ती वा संस्थेत तो दिला जावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.’– आल्फ्रेड बर्नार्ड नोबेलपॅरिस, 27 नोव्हेंबर 1895
डायनामाइटसारख्या अत्यंत स्फोटक पदार्थाची निर्मिती करणारा आल्फ्रेड प्रत्यक्षात किती मृदू स्वभावाचा होता हे त्याच्या हयातीत फारसं जगासमोर आलंच नाही.डायनामाइटचा इतरांनी केलेल्या दुरूपयोगामुळे प्रचंड मानसिक यातनांना सामोरं जावं लागलेल्या आल्फ्रेडनं म्हणूनच आपल्या संपत्तीचा मोठा भाग मानवी कल्याणासाठी कार्य करणार्यांच्या गौरवासाठी मागे ठेवला. नोबेलच्या नावानं देण्यात येणारा हा पुरस्कार लवकरच जगातील अत्यंत मानाचा पुरस्कार म्हणून सुप्रसिद्ध झाला.