अखेरची लढाई ही कादंबरी सवाई माधवराव पेशवे आणि नाना फडणीसांच्या जीवनातील विविध घटना-प्रसंगांवर आधारित आहे. नाना फडणीस उणीपुरी दोन तपे पेशवाईच्या कारभारात होते. सवाई माधवराव पेशव्यांच्या माता-पित्याचे अकाली निधन झाल्यानंतर पेशवाईचा वारस म्हणून त्यांनी सवाई माधवरावांची डोळ्यांत तेल घालून काळजी घेतली. त्यांचा आपल्या पुत्राप्रमाणे सांभाळ केला. माधवराव लहान असल्याने नानाच पेशव्यांच्या वतीने सर्व निर्णय घेत आणि राज्यकारभार पाहात असत. याच कालावधीत मुजोर झालेल्या निजामाला अद्दल घडविण्यासाठी नानांनी युद्ध पुकारले आणि आपल्या चातुर्याने (व दैवाची साथ लाभल्याने) ते जिंकून निजामाला सर्व अटी मान्य करायला लावून, शरण येण्यास भाग पाडले. पेशवे आणि दौलतीसाठी नाना फडणीसांना असाच परकीयांचा आणि स्वकीयांचाही सामना करावा लागला.