हा होईल दानपसावो? पसायदान हे ज्ञानेश्वरीचे अमृतमधुर फळ आहे. मुळात ज्ञानेश्वरी हेच एक अमृताचे झाड आहे. त्याची मुळे, त्याचे खोड, त्याच्या फांद्या, त्याची पाने, त्याची फुले हे सर्व वैभव रम्य व मधुर आहे. या सर्व माधुर्याचे व ऐश्वर्याचे सुगंधी अत्तर पसायदानामध्ये उतरले आहे. आताच्या कळवळ्यापोटी गीतेच्या सातशे श्लोकांवर नऊ हजार ओव्यांची टीका लिहून ज्ञानेश्वरांचा वाग्यज्ञ पूर्णतेला गेला. त्याप्रीत्यर्थ त्यांनी यज्ञदेवतेजवळ याचिलेला प्रसाद म्हणजे हे पसायदान. एका अलौकिक विश्वमानवाला प्रतीत झालेले गीतेचे अंतरंग उलगडून दाखविण्यासाठी मांडलेला विशाल वागप्रपंच आवरता घेताना कृतकृत्य अंतःकरणाने त्यांनी हे पसायदान मागितले आहे. ही प्रार्थना यज्ञकर्ता, होता वा ऋत्विजाकरता नसून, ज्यांच्या कल्याणासाठी यज्ञाचे प्रयोजन, त्यांच्यासाठीच केली आहे. आपले यज्ञकर्तव्य आटपून ज्ञानेश्वर जण त्या उत्तरदायित्वातन आता मक्त झाले. यज्ञविधी व यज्ञफल यांचे पुण्य त्यांनी आपल्या श्रोत्यांना अर्पण केले.