आपल्या मुलांनी शिकावं, मोठं व्हावं इतक्यापुरत्याच आता पालकांच्या अपेक्षा मर्यादित राहिल्या नाहीत, तर आपल्या मुलांनी दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतानाच जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आघाडीवर राहावे, असे आता पालकांना वाटते.मुलांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी पालकांची केवळ खर्च करण्याची आणि त्यांना हव्या त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी पुरेशी आहे का? हीच मध्यवर्ती भूमिका ठेवून ‘अभ्यासातील भरघोस यशासाठी A to z मार्गदर्शन’ या पुस्तकाची आखणी आणि मांडणी करण्यात आली आहे.आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्याच्यावर आदर्श संस्कार कसे करावेत, मुलांचा अभ्यास पालकांनी कशा प्रकारे घ्यावा, मुलांच्या अभ्यासात पालकांचा सहभाग कसा आणि किती प्रमाणात असावा, पालकांनी शिक्षकांशी कशा प्रकारे सुसंवाद साधावा, मुलांच्या शालेय समस्या कशा प्रकारे जाणून घ्याव्यात आणि मुलांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करावेत? याबरोबरच मुलांचा घर ते शाळा हा प्रवास कसा असावा, मुलांच्या दप्तराची काळजी कशा प्रकारे घ्यावी आणि महत्त्वाचे म्हणजे मुलांचा डबा कशा प्रकारे तयार करावा? अशा अनेक विषयांवर त्या त्या विषयातील तज्ज्ञांनी दिलेली मूलभूत आणि शास्त्रीय माहिती या पुस्तकात दिली आहे.