मराठी वाङ्मयाला नवे वळण देणारे आणि एकूणच मराठी वाङ्मयात ‘नवते’चे वारे निर्माण करणारे दमदार नियतकालिक म्हणून ‘अभिरुचि’ या नियतकालिकाचे महत्त्व फार मोठे आहे. ‘अभिरुचि’ने मराठी वाङ्मयात तर नवता प्रस्थापित केलीच, पण त्याहीपेक्षा वाचकांना प्रोत्साहित करणारी, जागृत करणारी, सजग करणारी नियनिराळी ‘सदरे’ चालवून वाङ्मय ही केवळ लेखक-कवींची, संपादक-प्रकाशकांची मक्तेदारी नसून,वाचकमनापर्यंत पोहोचणारी ती एक चळवळच आहे, ही धारणा प्रस्थापित केली. डॉ. मृणालिनी कामत यांनी ‘अभिरुचि’ मासिकाच्या वाङ्मयीन कार्याचा सखोल व चिकित्सक अभ्यास केलेला आहे; तो यथावकाश ग्रंथरूपाने बाहेर येईलच. येथे त्यांनी ‘अभिरुचि’च्या अव्वल कालखंडातील म्हणजेच जोपर्यंत ते नियतकालिक बडोदे येथून प्रसिद्ध होत होते, त्या 1943 ते 1953 या अकरा वर्षाच्या कालखंडातील समग्र साहित्याची वाङमयप्रकारांनुसार सूची दिलेली आहे. मुख्य म्हणजे ‘अभिरुचि’चे वाङ्मयीन कार्य विशद करणारा सुदीर्घ लेखही डॉ.कामत यांनी या सूचिग्रंथास जोडलेले आहे. त्यामुळे हा सूचिग्रंथ अभ्यासकांना निश्चितपणे दिशादर्शक करणारा ठरेल. - डॉ. विद्यागौरी टिळक