डॉ. रतिकांत हेंद्रे हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत संशोधक म्हणून ३४ वर्षे कार्यरत होते. त्यांनी मॉलिक्युलर बायॉलॉजीमध्ये संशोधन करून पुणे विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी मिळविली. टिश्यू कल्चरमधील त्यांचे संशोधन पथदर्शक म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्या या संशोधन कार्याबद्दल त्यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘सी.एस.आय.आर. (CSIR) टेक्नॉलॉजी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. त्यांचे शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. आरोग्याच्या क्षेत्रात श्रेष्ठत्व पावलेले काही संशोधक आहेत. उदा. संपूर्ण आयुष्य झाकोळून टाकणार्या पोलिओवर प्रतिबंधक लस शोधून काढणारे डॉ. जोनास साल्क आणि डॉ. साबीन, इन्सुलिनचा शोध लावणारे डॉ. बँटिंग, पेनिसिलीन आणि स्ट्रेप्टोमायसिनचा शोध लावणारे अनुक्रमे डॉ. हिटली आणि डॉ. वाक्समन, मक्यावरील संशोधनात आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणार्या, वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या डॉ. बार्बारा मॅक्लिन्टॉक आणि आणखी काही संशोधकांची माहिती या पुस्तकात दिली आहे. आपल्या आरोग्यसंपन्न जीवनाचे काही श्रेय या संशोधकांना द्यायला हवे. या संशोधकांच्या जिद्दीची, त्यांच्या निष्ठेची आणि त्यांच्या संशोधन कार्याची ही शोधयात्रा!