डॉ. रतिकांत हेंद्रे हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत संशोधक म्हणून ३४ वर्षे कार्यरत होते. त्यांनी मॉलिक्युलर बायॉलॉजीमध्ये संशोधन करून पुणे विद्यापीठाची पीएच्.डी.पदवी मिळविली. टिश्यू कल्चरमधील त्यांचे संशोधन पथदर्शक म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्या या संशोधन कार्याबद्दल त्यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘सी.एस.आय.आर. (CSIR) टेक्नॉलॉजी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांचे शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. रूढ अर्थाने हे केवळ वनस्पती शास्त्राचे पुस्तक नाही. यात फळांचे मूळस्थान आणि इतिहास आहे. लेखकाने फळांच्या संदर्भातील धार्मिक, पौराणिक संकल्पना देतानाच फळांची वैशिष्ट्ये आणि औषधी गुणधर्म सांगितले आहेत. फळांची पोषणमूल्ये सांगतानाच लेखकाने फळे पक्व होताना त्यांत होणारे जीव-रासायनिक बदलही समजावून सांगितले आहेत. या पुस्तकातील फळे आपल्या परिचयाची असली तरी लेखांतील नवा शास्त्रीय दृष्टिकोन असलेला आशय मनोवेधक आणि मनोरंजकही आहे.