मनावर सुसंस्कार असले म्हणजे मन प्रसन्न राहते; तसेच संस्कार तनावरही हवेत म्हणजे तन तंदुरुस्त राहते. हे तनाचे आरोग्य व सौंदर्य वाढवण्यासाठी जे अन्न सेवन केले जाईल तेही संस्कारित असेल, तर या अन्नातून आवश्यक पौष्टिक घटक प्राप्त होऊन शरीराचे पोषण उत्तम होईल. अन्नघटक काय असावेत? ते कसे वापरावेत? घातक काय? पोषक काय? कुठल्या पदार्थातून आपल्याला शक्ती मिळेल? केव्हा व किती वेळेला खावे? काय खावे? कसे खावे? कशासाठी? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून मिळतात.गृहिणी व स्वयंपाकघर हे एक मोठे भांडार व प्रयोगशाळा आहे. या स्वयंपाकघरात पदार्थ कसे शिजविले जातात, स्वच्छता कशी राखली जाते, अन्नांश, विशेषत: जीवनसत्त्वे नष्ट होऊ नयेत म्हणून काय करावे हे गृहिणीला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पटवून दिले, तर आजची सुशिक्षित, 21व्या शतकातील प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणारी गृहिणी ते सहज आत्मसात करते.डॉ. श्रीकांत चोरघडे आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांनी या पुस्तकाद्वारे आधुनिक आहारशास्त्राचे ज्ञान समाजातील सर्व स्तरांवर पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक व्यक्तीला आहारशास्त्राची माहिती अगदी सोप्या भाषेत व्हावी, पौष्टिक आणि संतुलित आहारसंस्कारांची रुजवण घरोघरी होऊन प्रत्येक कुटुंबात आरोग्यसंपन्नता नांदावी या उद्देशाने टाकलेले पाऊल म्हणजेच ‘आपला आहार, आपले आरोग्य.’