ज्ञानपीठ पुरस्कार-प्राप्त डॉ. गुरुदयाळ सिंह म्हणजे पंजाबी भाषा-साहित्यातील लक्षणीय मानदंड. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, बालवाड़्मय आणि अनुवाद असे सर्व साहित्यप्रकार त्यांनी सहजपणे हाताळले आहेत. त्यांच्या कथासाहित्याचा विचार करू जाता काही गोष्टी ठळकपणे समोर येतात. छोटा कुणबाव असणारे शेतकरी, शेतमजूर, भटक्या-फाटक्या नि उपेक्षित समाजवर्गातील थकलीभागली माणसे ही त्यांची प्रमुख पात्रे. त्यांच्या जगण्या-भोगण्यातील साध्याच, पण कस पाहणार्या प्रसंगात गुरुदयाळजी असा काही जीव ओततात की आपसूकच वाचक त्या पात्र-प्रसंगांचा भोक्ता साक्षीदार होऊन जातो. कुटुंब-कलह, उणे-दुणे काढण्याची मत्सरी वृत्ती, नात्यागोत्यातील मानापमानाचे नाट्य, भाऊबंदातील तेढ, गोरगरिबांचे सडले-पिडलेले जीवन इत्यादींचा भावोत्कट आणि कलात्मक प्रत्यय त्यांच्या बहुतेक कथांतून येतो. त्यांची भाषाशॆलीही सहजोत्स्फूर्त आणि प्रभावशाली आहे. सारे एकदम रोखठोक आणि चोख. कुठे नाटक किंवा नकटेपणा नाही. काही कथांमधून त्यांनी प्रतीकात्मक पध्दतीने घेतलेला जीवनवेध वेडावून टाकतो. गुरुदयाळजी एक माणूस म्हणूनही तितकेच उत्तुंग, उदारमनस्क आणि ऊर्ध्वगामी आहेत. त्यांच्यातील कलावंत आणि माणूस या उभयतांचा सात-बारा मोठा विलोभनीय आहे.