खेळण्या-बागडण्याच्या वयात एखादं मूल कोकच्या बाटल्या विकतं, घरोघरी वर्तमानपत्र टाकतं. एवढंच नव्हे तर यांसारखे अनेकविध व्यवसाय करून मिळवलेल्या रकमेतून अकराव्या वर्षी शेअर्सची खरेदी करतं… लवकरच जमीन विकत घेतं आणि इन्कम टॅक्सचं रिटर्न दाखल करून हशारीने आपली मिळकत व खर्च यांचा हिशेबही मांडतं…ही कोणतीही काल्पनिक कथा नव्हे तर हे आहे दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांच्या बालपणाचं वर्णन…जगाला स्तिमित करणारं गुंतवणुकीचं साम्राज्य उभं करणारे वॉरन जितके श्रीमंत आहेत तितकेच मूल्यसंपन्नही. सर्वोच्च दर्जाची व्यावसायिक तत्त्वं आणि अफाट दानशूरता हे त्यांच्या लखलखत्या कारकिर्दीतील महत्त्वाचे पैलू.व्यवस्थापनातील आदर्श असलेल्या वॉरन यांनी आपल्या यशाची सूत्रं वेळोवेळी सर्वांसमोर खुली केली आहेत. त्याचबरोबर दीर्घकालीन गुंतवणुकीकडे बघण्याचा विवेकी दृष्टिकोन देऊन त्यांनी गुंतवणूकदारांसमोर आदर्शही ठेवला आहे.त्यांच्या याच दृष्टिकोनातून आकाराला आलेले हे अनोखे गुंतवणूक मंत्र वाचकांसाठी दीपस्तंभ ठरतील.