मराठीमध्ये वाङ्मयाच्या सैद्धांतिक समीक्षेचा अभाव आहे. वाङ्मयविषयक सर्व जटिल प्रश्नांची समर्पक उत्तरे देणाऱ्या आणि वाङ्मयकृतीच्या अस्तित्वाचा आणि तिच्या सर्व घटकांच्या परस्परसंबंधाचा उचित अर्थ सांगून तिच्या मूल्यमापनासंबंधीचे याेग्य निकष देणाऱ्या भूमिकेचा नव्याने शाेध घ्यावा, ही प्रेरणा मराठी समीक्षेत दिसून येत नाही. दीडशे वर्षांच्या मराठी समीक्षेच्या इतिहासात असे दाेनच प्रयत्न झाले. बा.सी. मर्ढेकरांनी सर्व ललित कलांच्या आंतररचनेसंबंधीचा आपला लयसिद्धांत मांडला. त्यानंतर लगेचच विंदा करंदीकरांनी सर्व ललित कलांमधून वाङ्मयकला बाजूला काढणारा आणि वाङ्मयकलेचे वेगळे स्वरूप अधाेरेखित करणारा ‘जीवनवेधी कले’चा सिद्धांत मांडला. मराठीत जशी मर्ढेकरांच्या लयसिद्धांताची दखल घेतली गेली, तशी करंदीकरांच्या जीवनवेधी कलेच्या सिद्धांताची घेतली गेली नाही. किंबहुना त्यांच्या वाङ्मयविषयक सैद्धांतिक भूमिकेची उपेक्षाच झाली. खरे म्हणजे करंदीकरांनी केवळ जीवनवेधी कलेचा सिद्धांतच मांडला नाही, तर त्यांनी हा सिद्धांत केंद्रस्थानी ठेवून समग्र काव्यशास्त्रच उभे केले. या पुस्तकातून सुप्रसिद्ध समीक्षक डॅा. सुधीर रसाळ यांनी पहिल्यांदाच विंदांच्या काव्यशास्त्राची सैद्धांतिक समीक्षा मांडलेली आहे.