मी सतत नवीन काही जगावेगळं शोधत राहिलो. काहीतरी समाजोपयोगी, दिशादर्शक, कलात्मक, धाडसी गोष्टींचा शोध घेतला. अर्थात ही शोधयात्रा मलाच घडवत गेली. कारण जगावेगळ्या गोष्टींचं व व्यक्तींचं एक वेगळंच जग माझ्यासमोर उभं रहिलं. भौतिक सुखांच्या नको एवढं मागे लागलेल्या आजच्या जगात कुणी संस्कृत भाषा, मराठी व्याकरण, देवनागरी लिपी, वाचन, संस्कृती, वॆदिक गणित यांचं जतन संवर्धन व्हावं म्हणून इतके कष्ट करत असेल हे खरंही वाटत नाही. बातमी म्हणून मी त्या गोष्टींपर्यंत पोचलेलो असलो तरी, त्याचा खोलात जाऊन वेध घेतला. अधिक सुस्पष्टपणे ते लोकांपर्यंत आणलं. अनेकांना हे सारं दिशादर्शक व प्रेरणादायी ठरेल असा विश्र्वास वाटतो.