ज्याप्रमाणे महासागरात खोल तळाशी अशा शांत जागा असतात, जिथे भयंकर वादळही पोहोचू शकत नाहीत त्याचप्रमाणे माणसाच्या अंर्तहृदयातही अशी शांत आणि पवित्र ठिकाणं असतात, ज्यांना पाप आणि दु:खाचे वादळ विचलित करू शकत नाही. तिथे पोहोचणे आणि जाणीवपूर्वक राहणे म्हणजेच शांती.आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण यश आणि संपत्ती मिळविण्याच्या मागे धावतो आहे. त्यासाठी वाटेल ते करण्याची माणसाची तयारी आहे. जसजसे यश व संपत्ती मिळत जाते, तसतशा मानवाच्या गरजा व हव्यास वाढत जातो; पण यातून सुख, समाधान मिळतेच असे नाही. तर आपण संघर्ष आणि तणाव आपल्याकडे आकर्षित करतो. यश आणि संपत्तीबरोबरच सुख, आरोग्य आणि समाधान हवे असेल तर त्यासाठी गरज आहे, शांतीचा मार्ग अवलंबण्याची.जीवनातील चिंता, तणाव यांच्यातून बाहेर पडा. स्वार्थाच्या होरपळून टाकणार्या प्रखर उष्णतेतून बाहेर या आणि अंर्तमनातील त्या विश्रांतीस्थानात प्रवेश करा. तेथील शांतीची सुखद हवा तुम्हाला नवचैतन्य, नवजीवन देईल.शांती म्हणजेच स्वर्गाचे अधिराज्य होय. ही शांती मिळविण्यासाठी ध्यान, स्वार्थत्याग, सत्य, आध्यात्मिक शक्ती आपणास मदत करते. या स्वार्थी युगात निस्वार्थ प्रेम तसेच परिपूर्ण शांततेचा साक्षात्कार कसा घडवून आणावा, याचे विस्तृत विवेचन प्रस्तुत पुस्तकात केले आहे. शांती मिळविण्यासाठी आपण काय करावे आणि काय करू नये, याचेही वर्णन यात उत्तमरित्या केले आहे.