दोन महायुद्धांमधल्या काळात स्टेफान झ्वाइग (१८८१-१९४२) या बहुचर्चित जर्मन लेखकाचे नाव जगभरातील साहित्य रसिकांच्या हृदयात पक्के बसले होते. सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या या लेखकाने कथा, कादंबरी, चरित्र, नाटक हे साहित्यप्रकार सारख्याच सफाईने हाताळले. त्याच्या पुस्तकांची तीस भाषांतून भाषांतरे झाली. झ्वाइगच्या मूळ जर्मन भाषेतील चार गाजलेल्या दीर्घकथांचे इंग्रजीवरून केलेले अनुवाद या पुस्तकात संग्रहित करण्यात आले आहेत. भिन्न भिन्न विषय, चित्तवेधक कथानके, नाट्यमय प्रसंग व ओघवती भाषा यांमुळे या कथा ज्याप्रमाणे वाचकाला खिळवून ठेवतात, त्याप्रमाणे त्यांतील खोल आशयामुळे अंतर्मुखही करतात. ज्यूधर्मीय झ्वाइगच्या आयुष्याचा शेवट सुन्न करणारा असला, तरी आपल्या साहित्यकृतींनी हा थोर लेखक अमर झाला आहे. या कथासंग्रहाच्या प्रास्ताविकात झ्वाइगच्या जीवनचरित्राचा तसेच त्याच्या साहित्याचा परिचयही करून देण्यात आला आहे.