डॅनिएल हा हॉवर्ड व लॉरा या दाम्पत्याचा डॉक्टर होऊ पाहणारा लाडका मुलगा. हे कुटुंब सुखवस्तू आहे. चेरी नावाची गरीब घरातील मुलगी त्याच्या प्रेमात पडते. तो तिला त्याच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी घेऊन येतो; पण त्याच्या आईच्या, लॉराच्या लक्षात येतं की, चेरीची नजर त्यांच्या संपत्तीवर आहे. लॉरा ही गोष्ट डॅनिएलला समजावू पाहते; पण त्याला ते पटत नाही. तो आणि चेरी एकदा वीकेन्डला गेलेले असताना अपघात होतो आणि डॅनिएल कोमात जातो. त्या अपघाताला अप्रत्यक्षरीत्या चेरीच जबाबदार असते. डॅनिएल गेला, असं लॉरा तिला खोटंच सांगते. काही दिवसांनी डॅनिएल शुद्धीवर येतो, तेव्हा चेरी त्याला सोडून गेली, असं लॉरा त्याला सांगते. डॅनिएल जिवंत असल्याचं जेव्हा चेरीला समजतं, तेव्हा ती लॉरासमोर येऊन उभी ठाकते. मग दोघींमध्ये रंगतो शह-काटशहाचा सामना. मग चेरी ठरवते, लॉरालाच नाहीसं करायचं. काय घडतं पुढे? चेरी यशस्वी होते का? प्रेमकहाणीच्या आडून रंगलेलं एक जबरदस्त, थरारक संघर्षनाट्य.