राजे राजवाडे, महाराण्या, राजपुत्र, राजकन्या, कंजूष माणसं, जवळ फुटकी कवडीही नसलेली दरिद्री माणसं, शहाणी माणसं, विद्वान माणसं, चतुर माणसं, मूर्ख आणि अडाणी माणसं, चमत्कारिक स्त्रिया व पुरुष, चित्रविचित्र घटना या सुरस कथांमधून जिवंत होऊन आपल्या भेटीला येतात. एका कथेतील बुद्धिमान राजकन्येला आपल्यापेक्षा हुशार पती हवा असतो, म्हणून ती सर्व विवाहोत्सुक तरुणांना प्रत्येकी नऊ प्रश्न विचारण्याची संधी देते, पण अखेर तिलाही निरुत्तर करणारा कोणीतरी भेटतोच... एक अनाथ मुलगा आपल्या दुष्ट काकांना चांगली अद्दल घडवतो... आणि संकटात सापडलेल्या एका वृद्ध जोडप्याला उपयोगी पडतो तो एक ढोल! यातील काही कथा लेखिका सुधा मूर्ती यांनी आपल्या बालपणी आजीआजोबांकडून ऐकल्या... तर काही कथा देशोदेशी केलेल्या भ्रमंतीच्या दरम्यान त्यांना ऐकायला मिळाल्या... काही कथा त्यांच्या स्वत:च्या कल्पनाशक्तीतून कागदावर उतरल्या... या सर्वच्या सर्व सुरस, कालातीत अशा लोककथा गेली कित्येक वर्षं लेखिकेच्या मनात घर करून राहिलेल्या आहेत. वेळोवेळी आपल्या सहवासात आलेल्या लहान मुलामुलींना, आपल्या विद्याथ्र्यांना त्यांनी त्या सांगितल्या आहेत. आज या कथासंग्रहाच्या रूपाने या सर्व कथा लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वच वाचकांना वाचनासाठी उपलब्ध होत आहेत.