यशवंत मनोहर यांनी ‘तत्त्वज्ञानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’
या पुस्तकात बाबासाहेबांचे विश्वपुनर्रचनेचे तत्त्वज्ञान
अधोरेखित केले आहे.
विषमता शोषणासाठीच निर्मिली जाते. वर्चस्वासाठीच भेदांचा, गुंतागुंतीचा पसारा तयार केला जातो. ही अमानुष प्रक्रिया माणसांना त्यांच्या मूळ निरामय आणि स्वतंत्र मानवी अस्तित्वापासून तोडते.
तोडलेेली माणसे आणि त्यांना तोडणारी माणसेही
आपल्या मूळ निरामय मानवी अस्तित्वालाच मुकतात. बाबासाहेबांचे पूर्ण इहवादी आणि समान सन्मानवादी तत्त्वज्ञान
या सर्वांनाच या तुटलेपणापासून (एलीनेशन) मुक्त करू शकते.
स्वत:त सतत संस्करणे आणि परिष्करणे करीत जी जीवनधाटी जीवनासाठी स्वत:ला अद्ययावत ठेवते, तिलाच संस्कृती म्हटले जाते. त्यामुळे समाजाला एकाच ठिकाणी गोठवून ठेवणार्या
धर्मांना आणि परंपरांना मूलतत्त्ववादी म्हटले जाते.
बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान मुक्त-तत्त्ववादी आहे. त्यांच्या नजरेत एकूणच मानवी जीवनाचे प्रज्ञान आहे. कुठेही थांबा नसलेले
हे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान माणसाला एकमेव महानायक मानते.
या वैश्विक तत्त्वज्ञानाचा सर्वोपकारक मर्मार्थ लेखकाने
या पुस्तकात स्पष्ट केला आहे.