आता, काही दिवसांच्या आतच पाकिस्तान प्रत्यक्षात येत आहे, याची खात्री पटल्यावर जीना यांना एक अफलातून कल्पना सुचली. लागलीच त्यांनी ती माऊंटबॅटन यांना ती इतकी पसंत पडली की, त्या संबंधात पं. नेहरूंची संमती मिळवायची कामगिरी त्यांनी स्वत:कडे घेतली. पुढच्या बॆठकीत माऊंटबॅटन नेहरूंशी त्या कल्पनेसंबंधी मोठ्या उत्साहाने बोलू लागले. मुळात ही कल्पना कोणाची असावी, हे नेहरूंनी लगेचच ओळखले. जीना असे काही सुचवतील, याची कल्पना नेहरू करू शकत होते. परंतु, असल्या विक्षिप्त सूचनेचा माऊंटबॅटन यांच्यासारख्या तटस्थ व्यक्तीने आग्रही पाठपुरावा करावा, याचे नेहरूंना नवल वाटले. काही बोलायच्या अगोदर, ते काही क्षण माऊंटबॅटन यांच्याकडे नुसते पाहत राहिले. ही आणि अशा अनेक घटना - फारशा माहीत नसलेल्या; परंतु त्या कालखंडाने अनुभवलेल्या. त्यांचेच हे, विश्र्वसनीय कागदपत्रांच्या आधारे करण्यात आलेले लेखन.