सुंदर ती दुसरी दुनिया सिनेमा खोटा असतो, परंतु आयुष्य किती किती त-हेनं खरं असतं ते दाखवण्याची कुवत कॅमे-यात असते. हे लक्षात ठेवून सिनेमे निघत होते, तो हिंदी चित्रसृष्टीचा सुवर्णकाळ. सिनेमा हा लोकांचा असतो. लोकांनी, लोकांसाठी केलेला. परंतु मनोरंजनाची सबब पुढे करून सिनेमा झुंडीच्या हाती जाता नये. सिनेमावाल्यांनी कला आणि करमणूक यातला समतोल छान साधला. 1930 ते 1960 या तीन दशकांत हे घडलं. म्हणून हा हिंदी सिनेमाचा वैभवकाळ. 'पाहता पाहता' सिनेमा मोठा झाला. त्याची ही गोष्ट. सिनेमाला बरकत यावी म्हणून अनेक थोर कलावंत, दिग्दर्शक, लेखक, संगीतकार आणि तंत्रज्ञ झिजले. 'निर्जन प्राणाचा व्रतस्थ दिवा' होऊन जगले. त्यांची ही गोष्ट. प्रत्येकाच्या मनात सिनेमाची एक सुंदर दुनिया वसत असतेच. मनाला हुरहूर लावणारं ते जग या पुस्तकात वस्तीला आलंय.