सुधारकांची आणि बुद्धिवादी विचारवंतांची एक महान परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. बाळशास्त्री जांभेकरांपासून सुरू झालेली सुधारकांची मालिका तर्कनिष्ठ बुद्धिवादी विचारांचा प्रवाह पुढे पुढे नेत होती. सुधारकांच्या सुधारणावादी विचारचिंतनाचा माणूस हाच केंद्रबिंदू होता आणि बुद्धिवादी भूमिकेतून होणारा मानवी विकासाचा परीघ विस्तारीत ते सुधारणेचे नवे विश्व उभे करीत होते. डोळसपणे समाजाचे अवलोकन करून ते द्रष्टेपणाने मांडणार्या सुधारकांच्या ह्या बुद्धिप्रामाण्यवादी विचारांनीच महाराष्ट्राच्या लोकजीवनाला पुरोगामी दृष्टी लाभली, यात शंका नाही. आजच्या काळातही समाजसुधारकांचे हे विचार मोकळे आणि प्रागतिक असल्याचे दिसून येते. तत्कालीन परिस्थितीत असा क्रांतिकारी विचार मांडणे हेही एक बंडच होते. आजच्या नवभारताचे विज्ञाननिष्ठ रूप त्यांच्या त्यागातून व योगदानातूनच उभे राहिले आहे. त्यांच्या ह्या प्रबोधनकारी कार्याचे मोल व विचार ह्या पुस्तकातून पुन्हा समजून घेता येतील.