'ही अवघी सृष्टी म्हणजे जणू सृजनाचा फुललेला मळा! या मळयाला सिंचन करतात पै-पर्जन्याच्या धारा. एकाकी वाटणाऱ्या आभाळात विहार करतात मेघदूत. रहाटमाळ न कुरकुरता विहिरीत उतरते, पाण्याने भरते, वर येते, पन्हाळयात रिकामी होते... रिकामी होते, म्हणून पुन्हा भरते. समर्पण आहे म्हणून भरून पावणे आहे. गातगात देत राहणे, देता देता भरून पावणे हाच आनंदाचा मूलमंत्र. निसर्गाच्या खुल्या पाठशाळेत हा मूलमंत्र आपलासा करण्याची किमया ज्याला साधली, अशा हळव्या कविहृदयाच्या धर्मोपदेशकाने रचलेली भावकविता म्हणजे सृजनाचा मळा. जीव लावणारे लोभस पक्षी नि आत्म्याचे पोषण करणारे कोकिळगान... कोजागिरीच्या रात्रीचा नृत्यरंग नि मुग्ध चाफा... गंधाच्या रानात तो आणि ती ह्यांनी मांडलेला खेळ... शब्बाथराणीचा लडिवाळ सहवास नि प्रिय येशूचा आश्वासक आधार... अशी एक ना दोन... अनेकानेक निसर्गचित्रे रेखाटणारी प्रसन्न शैलीतील ही आस्वादक गद्यकाव्ये मराठी ललित वाङ्मयाच्या दालनात मानाने मिरवतील, यात शंकाच नाही!'