सिद्धार्थ बुद्धिमान, सर्वांचा प्रिय देखणा ब्राह्मणपुत्र. असं असूनही तो जीवनाविषयी असमाधानी आहे. अस्तित्वाचं उच्चतम उद्दिष्ट शोधण्यासाठी आध्यात्मिक प्रवासाला निघालेला सिद्धार्थ मार्गात संपत्ती आणि मोहात भरकटत जातो. शृंगाराच्या, शारीरिक सुखाच्या मागे लागून भान हरपतो. दिशाहीन भटकत असताना सरतेशेवटी तो एका नदीकिनारी पोचतो. तिथे एक नावाडी त्याला योग्य दिशा दाखवतो. आपलं विधिलिखित काय आहे आणि अंतिमत: अस्तित्वाचा अर्थ काय हे सिद्धार्थला त्या नावाड्यामुळे समजतं. हरमन हेसला भारतीय पारलौकिक तत्त्वज्ञानाविषयी आत्यंतिक आदरभावना होती. त्यामुळे प्रेरित होऊन लिहिलेली सिद्धार्थ ही कादंबरी सहजसुंदर भाषाशैलीमुळे वाचनीय झाली आहे. 20 व्या शतकातील आध्यात्मिक विषयावरील अत्यंत प्रभावशाली साहित्यामध्ये ‘सिद्धार्थ’ची गणना केली जाते.