जगात नित्य काय? सुखदु:खाची पाठशिवण म्हणजेच जीवन? कशासाठी जगतो माणूस? त्याला शेवटी हवंय तरी काय? काय मिळाल्यानंतर त्याचं जगणं परिपूर्ण होतं? हा सगळा जीवनभरचा प्रवास कशासाठी?... ....या जीवनाच्या गाभ्याशी काहीतरी सत्य नक्कीच लपलेलं आहे. मनावर साचलेली सारी मळभं काढून, आत आत दडलेलं सत्य शोधणं म्हणजे तर जीवन नव्हे? ....या जीवनात काहीच अर्थ नसता, तर माणूस असा जीवनाच्या पाठीमागे धावला नसता. माणसाचं जीवन म्हणजे एक झोकाच! ....झोका उंचीवर गेला की तिथून खालचं जग किती मनोहर दिसतं! किती रम्य! पण क्षणभरच.. ते दृश्य नजरेत येतं न येतं, तोवर झोका खाली येतो. तो कधीच उंचीवर टिकत नाही. पण जे टिकतं ते तिथून बघितलेलं.. दिसतं न दिसतं, तोवर अदृश्य झालेलं ते सुंदर दृश्य.. तेच फक्त मनात साठवून झोक्यावरून जमिनीवर उतरायचं असतं.