आंध्रमधील तिरुमलै अथवा सप्तगिरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या पर्वतावर श्रीवेंकटेश हा देव नांदतो आहे. हा केवळ भारतातीलच नव्हे, तर सार्या जगातील अत्यंत श्रीमंत देव आहे. महाराष्ट्रातील पंढरपूरचा श्रीविठ्ठल, ओरिसातील पुरीचा श्रीजगन्नाथ आणि आंध्रप्रदेशातील तिरुमलैचा श्रीवेंकटेश हे वैष्णवांचे तीन देव अत्यंत लोकप्रिय आहेत; ते खर्या अर्थाने लोकदेव आहेत. या तिघांचीही उन्नयनप्रक्रिया भारताच्या सांस्कृतिक घडणीत लक्षणीय ठरलेली आहे. वेंकटेशाचे महाराष्ट्राशी जिव्हाळ्याचे नाते आहे. या नात्याचा शोध हा आंतरभारतीय, विशेषत: दक्षिण भारतीय सांस्कृतिक अनुबंधाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. वेंकटेशाने महाराष्ट्र आणि दक्षिण भारत यांच्यामध्ये संस्कृतीचे सेतुबंध निर्माण केले आहेत आणि या भावसंपन्न सेतुबंधांचे महिमान उभय प्रदेशांतील लोकमानसाच्या बळकट श्रद्धांत स्थिरावलेले आहे. परंतु सांस्कृतिक इतिहासाच्या क्षेत्रात आजवर त्याची सामग्य्राने नोंद झालेली नाही. तशी ठसठशीत नोंद होणे आणि सामाजिक-सांस्कृतिक विघटनापासून सत्त्वशील समाजाला वाचवणे, हे विधायक दृष्टीच्या इतिहासकारांचे कर्तव्य आहे.