‘श्री गजानन दर्शन’ हे विख्यात लेखक भा. द. खेर यांनी ओघवत्या भाषेत लिहिलेले संतचरित्र. संतकवी दासगणू यांनी लिहिलेल्या ‘श्री गजानन विजय’ या एकवीस अध्यायांच्या पोथीतील गजानन महाराजांच्या चरित्राचे त्यानी संक्षेपाने गद्यरूपात विवरण केले आहे. प्रसंगानुरूप महाराजांनी केलेल्या चमत्काराचे वर्णन पोथीत वाचायला मिळते. (स्वत: लेखकांना महाराजांची प्रचिती आली आहे.) अनेक भक्त श्रद्धेने नित्यनियमाने पोथीचे पारायण करतात. महाराजांची उपासना करणार्याच्या संकटकाळी धाव घेऊन संकटमुक्त करतात, असा भाविकांचा अनुभव आहे. अनेकांना वेगवेगळ्या रूपांत दर्शन देऊन त्यांनी मार्गदर्शन केले आहे. प्रस्तुत ग्रंथात चमत्कारांचे शास्त्रीय विश्लेषण करणारा लेख आहे. त्यात जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ-संशोधकांच्या अध्यात्म विषयावरील विचारांचा मागोवा घेण्यात आला आहे. या पुस्तकात भाविकांना महाराजांचे आलेले अनुभव ग्रथित केले आहेत, ते विस्मयचकित करणारे आहेत. मूळ पोथीतील फलश्रुतीवर भाष्य करणारा लेख पुस्तकात समाविष्ट केला असून शेवटी नित्योपासनेसाठी महाराजांचे मंत्र आणि स्तोत्रे दिली आहेत. अशा ग्रंथाच्या वाचनामुळे श्रद्धा दृढ व्हायला मदत तर होतेच, शिवाय भक्तीमुळे शक्ती (आधार) प्राप्त झाल्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.