हा आहे ‘मृत्युंजयकार’ शिवाजी सावंत यांच्या विविधरंगी ललितलेखनाचा संच : ‘शेलका साज’! इथं सावंतांच्या खास रसश्रीमंत शैलीत वेध घेतलेले महाराष्ट्रवैभव कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जसे भेटतील, तसाच लेखकाला चकवा देऊ बघणारा वाचक अशी झूल पांघरलेला लपंगाही भेटेल. छ. शिवराय, शंभूराजे, महाराणी येसूबाई, सरलष्कर संताजी घोरपडे यांच्या जीवनझुंजीतील आजवर मराठी वाचक मनाला अज्ञात राहिलेल्या मनामनांच्या अणीदार वंगोऱ्यांना केलेला रसबाळा, तरल ललितस्पर्श भेटेल. तसाच कसा होता - असेल शिवकालीन रणसंमुख सामान्य मावळा यावर टाकलेला डोळस व वास्तव प्रकाशझोत असेल. इथं आर्य चाणक्याचा वेगळ्याच दृष्टीनं केलेला विचार दिसेल, तसंच, दीनदलितांना ‘आधारवड’ झालेल्या राजर्षी शाहूंचं क्षणदर्शन घडेल. सावंतांनी कथा मोजक्याच बेतल्या. मालिश, भिजाणे यांतून त्यांचं या आकृतिबंधाचं बळ दिसेल. ‘मुकी’ ही कथा तर अल्बर्ट कामूची आठवण करून देईल - यासाठीच या संचाचं शीर्षक : शेलका साज!!