अरुणा ढेरे यांच्या एकूण ललित लेखनात त्यांच्या विकसित होत गेलेल्या व्यक्तित्वाच्या आणि सृजनशीलतेच्या अनेक खुणा दिसतात. मरठी ललितगद्याच्या संदर्भात त्यांच्या लेखनाचे योगदान बहुपेडी मानावे लागेल. आत्मानुभवाच्या अंगाने जाणार्या ह्या लेखनप्रकारातील कलात्मकता आणि वॆविध्य त्यांच्या लेखनात जागोजाग दिसते, अभिजात कवयित्रीची तरल संवेदनक्षमता त्यांच्यापाशी आहे. व्यापक कुतूहल आहे. त्यांचे व्यक्तिमत्व संस्कारित आहे; सुसंस्कृत आहे आणि लेखणी निर्मितीक्षम आहे. तल्लख बुध्दिमत्ता, उत्कट भाववृत्ती आणि आपला अनुभव वाचकांपर्यंत संक्रांत करण्यासाठी आवश्यक असणारे शब्दप्रभुत्व, लालित्य त्यांच्यापाशी आहे. गेली अनेक वर्षे काव्यलेखनाबरोबर त्यांनी केलेले सकस आणि आत्मरंगी ललित लेखन मराठी ललित गद्याच्या प्रवाहात महत्त्वाचे ठरते, ते यामुळेच. - डॉ. वीणा देव