शेअर बाजारात गुंतवणूक करू पाहणार्या आणि उत्पन्नाच्या एका नवीन मार्गाचा शोध घेणार्या इच्छुकांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे. वाचकांना शेअर बाजाराविषयी अत्याधुनिक माहिती हे पुस्तक देते. एखादी भव्य इमारत उभी करण्यापूर्वी वास्तुविशारद तिचा तंतोतंत नकाशा रेखाटतो आणि त्यानंतर अभियंता तिला दृश्य स्वरूपात आणतो. याच तत्त्वानुसार प्रत्येक गुंतवणूकदाराने शेअर बाजारात ट्रेड करण्यापूर्वी रणनीती आखणे आवश्यक असते. यासाठी महत्त्वपूर्ण व्यावसायिक सल्ला या पुस्तकातून मिळतो. किरकोळ गुंतवणूकदारांच्या मनातील शंकाकुशंकांचे निरसन या पुस्तकातून मुद्देसूदपणे केले आहे. शेअर मार्केटमधील इंट्रा डे, ऑप्शन ट्रेड, स्विंग ट्रेड इ. गुंतवणुकीच्या प्रकारांवर लेखक आपल्याला प्रभावी पद्धतीने तरीही मनोरंजक शैलीत मार्गदर्शन करतात. प्रस्तुत पुस्तकात शेअर मार्केटमध्ये नफा मिळविण्यासाठी उत्सुक असणार्या सर्व लहान-मोठ्या गुंतवणूकदारांसाठी लेखकाने आपल्या 15 वर्षांच्या अनुभवाचे सार 41 क्लृप्त्यांमधून सांगितले आहे. या पुस्तकातील प्रत्येक विचार आणि संदेश गुंतवणूकदाराच्या मनात प्रगतीच्या मार्गावर चालण्याचा विश्वास जागवतो.