सयाजीराव गायकवाड हे काळापुढे दृष्टी असलेले सुधारणावादी आणि शिक्षणप्रेमी राजे होते.राजसत्तेचा उपयोग त्यांनी परिवर्तनाचे साधन म्हणून केला. प्रत्येक सुधारणा हुकूम काढून केली. हुकूम लिखित स्वरूपात असला पाहिजे असा महाराजांचा कटाक्ष होता. महाराज प्रवासात असले, घोड्यावरून प्रवास करत असले अथवा भोजनगृहात असले तरी तेथे कागद व पेन्सिल टांगलेली असे. त्यावर ते हुजूर हुकूम लिहून काढत. ते रजिस्टरमध्ये नोंदले जात. आज्ञापत्रिका ह्या सरकारी गॅजेटमध्ये जनतेच्या माहितीसाठी प्रकाशित केल्या जाई. चौसष्ट वर्षांच्या राज्यकारभारात महाराजांनी जवळ जवळ पंचाहत्तर हजार कायदे अथवा हुजूर हुकूम काढले आहेत. हा हिंदुस्थानातीलच नव्हे, तर जगातील एका राजाने केलेला विक्रमच आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात ग्रामपंचायतीद्वारे लोकशाही प्रशासनाचा प्रयोग करणारे सयाजीराव पहिले होते. त्यांचे राज्यकारभार, आर्थिक व्यवस्था, मानकऱ्याने कसे वागावे, नोकरवर्ग, न्यायपद्धती, शिक्षण, स्थानिक स्वराज्य, सामाजिक आणि आरोग्यविषयक सुखसोयीसंबंधीचे त्यांनी केलेले कायदे अर्थात हुकूम आजही आम्हाला प्रेरणा देणारे आहेत.