सयाजीराव गायकवाड हे गुणग्राहक राजा होते. कवळाणा गावातून ते राजा बनले. आपले बालपण, सर्व जातींचे सवंगडी आणि त्यांचे जगण्याचे प्रश्न ते पुढील आयुष्यात विसरले नाहीत. राजकारभार हाती येताच त्यांनी अस्पृश्य, आदिवासी प्रजेच्या शिक्षणाचा महत्त्वाचा हुकूम काढला. सरकारी खर्चाने पददलितांना शिकविण्याचा हा समाजक्रांतीचा महत्त्वाचा निर्णय आहे.जाती-धर्मांची बंधने झुगारून समतेची सुरुवात त्यांनी स्वतःच्या राजवाड्यातून सुरू केली. महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली. सयाजीराव, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर हे सर्वच युगपुरुष आहेत. त्यांच्या या वास्तव इतिहासाचे पुनर्वाचन ह्या पुस्तिकेच्या माध्यमातून व्हावं, ही भावना.