जोतीराव फुले यांनी धर्मप्रकरणी सत्यासत्य व कार्यकारणभाव यांचा शोध लावण्यास लोकांस सवय लावली, अमुक चाली बर्या किंवा वाईट यांचा न्याय त्यापुढे मांडला, मूर्तिपूजेचे खंडण केले, एकेश्वरी धर्माचे मंडन केले. धर्म, कर्म व व्यवहार यात लोक नाडले जाऊ नयेत म्हणून त्यांच्या समजुती पाडल्या. धर्मसंस्कार म्हणजे पूजाअर्चा, होमहवन व आहुती, मूर्तिपूजन, नैवेद्यार्पण, भूतपूजा वगैरे सर्व मतलबी साधूंच्या हिताचे असतात, तसेच धर्मभोळेपण व धर्मवेड हा सार्वजनिक सत्य धर्म ग्रंथ वाचल्याने जाईल, असेही फुले यांनी स्पष्ट केले. एका ईश्वरास भजावे, सद्वर्तनाने वागावे, सर्वांनी बहीणभावंडाप्रमाणे वागावे, सर्व मनुष्याला सारखेच हक्क असावे. जातिभेद नसावा, स्त्रियांना व पुरुषांना सारखे हक्क असावे, अशी परिवर्तनवादी भूमिका जोतीराव फुले यांनी प्रस्तुत पुस्तकातून उद्धृत के ली आहे. एकंदर सर्व मानवस्त्रीपुरुषांच्या उपयोगी हा ग्रंथ पडावा म्हणून या ग्रंथास ‘सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक’ असे नाव दिले आहे, असे स्वत: महात्मा फुले उद्धृत करतात. शूद्रादी अतिशूद्रास सत्याची जाण होऊन ते सुस्थितीत येतील, हा या ग्रंथकर्त्याचा निर्मळ उद्देश आहे. या पुस्तकाद्वारे शूद्रादी अतिशूद्रांस आपले जीवन सर्वांगीण दृष्टीने उज्ज्वल करण्यास उपयोगी पडेल, यात तीळमात्र संशय नाही. एवढे या पुस्तकाचे मोल आहे.