एका संतवृत्तीच्या माणसाने लिहिलेले हे पुस्तक स्वत:ला संत म्हणवणार्यांनी संतत्वाविषयी निर्माण केलेल्या संभ्रमाच्या काळात येत आहे, ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते. लेखक रवींद्र बेम्बरे संत धुंडामहाराज देगलूरकरांच्या नावानं ओळखल्या जाणार्या महाविद्यालयात प्राध्यापक आहेत, हा योगायोगही मला महत्त्वाचा वाटतो. या लेखनाला भावनेचा ओलावा असला तरी शास्त्रकाट्याची संशोधन कसोटी तंतोतंत पाळलेली दिसते.
पुस्तकाच्या शीर्षकात तुकाराम असला तरी सर्व संतांनी केलेला संतविचार आपल्यासमोर मांडलेला आहे. संत कसा नसावा ते आधी मांडून संत कसा असावा ते नंतर सांगितले आहे. संतांचं सोंग पांघरून असंत उजळ माथ्याने समाजात वावरतात ही समस्या सर्व काळात सारखीच असते, असे हे लेखन वाचताना जाणवत राहते. ती तुकारामाच्या आधी होती, तुकारामाच्या काळात होती आणि आजही आहे. त्यामुळं संतांचा असंतविचार आजही समकालीनच वाटत राहतो.
या पुस्तकाचे वाचन ही एका अर्थाने संत-संगतीच आहे. हे पुस्तक सामान्य वाचक, संशोधक आणि सांप्रदायिक या सर्वांना सारखाच आनंद देईल, याची मला खात्री वाटते.- इंद्रजित भालेराव