ज्या वेळी काँग्रेसच्या व्यासपीठावर अस्पृश्यता निवारणाचा केवळ ठराव पास होणेही मुश्कील होत होते, त्या वेळी राजर्षी शाहू महाराज हा कोल्हापूरचा द्रष्टा (दूरदर्शी) राजा आपल्या राज्यात अस्पृश्यतेचा नायनाट करणारे कायदे अमलात आणत होता. एवढेच नव्हे, तर महार, मांग, चांभार आदी अस्पृश्य समाजात मिसळून त्यांच्या हातचे अन्नोदक जाहीरपणे घेत होता; त्यांचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या पंगतीत बसवून त्यांचा सन्मान करत होता! चर्मकार समाजातील एका सुविद्य व्यक्तीला कोल्हापूर म्युनिसिपालिटीच्या चेअरमनपदावर बसवून देशासमोर सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्याचा आदर्श ठेवत होता! राजर्षी शाहू महाराजांचे जीवनध्येय, त्यांचे विचार व प्रत्यक्ष आचरण यामध्ये किती विलक्षण साम्य होते याची केवळ या एका उदाहरणावरून कल्पना येते.