मी द्वारका... द्वारकामाई.
ज्याचा धर्म कधी कुणाला कळला नाही, अशा ‘साई’नं शिर्डीतल्या वास्तव्यासाठी माझी- एका दुर्लक्षित पडक्या मशिदीची- निवड केली अन् नामकरण केलं ‘द्वारकामाई’! आईनं लेकराचं नाव ठेवायचं, पण लेकरानंच आईचं नाव
ठेवावं, हे माझं परमभाग्य!
तसं ‘साई’ हे नावदेखील आईनं ठेवलेलं नाहीच. साईचं जन्मस्थान, ठेवलेलं नाव, माता-पिता कोण, जात-धर्म कुठला... कधीच कुणाला कळलं नाही. हेच तर साईजीवनाचं अदृश्य, अनाकलनीय तरीही अलौकिक सूत्र.
‘द्वारकामाई’ हीच साईंची कर्मभूमी.
अशा देवमाणसाच्या वास्तव्यामुळे ही पडकी मशीद झाली ‘द्वारकामाई’ अन् शिर्डी झाली ‘देवभूमी’. त्या वास्तव्याची
मी ‘साईसाक्षी’! भिंतीला कान असतात असं म्हणतात.
या द्वारकामाईला तर दृष्टी आहे, मन आहे, स्मृतीदेखील आहे...
अन् साईच्या आठवणीत गुंतलेला जीवदेखील आहे!
त्या आठवणी सांगण्यासाठी, माझ्या गर्भात साईनं चेतविलेल्या, आजतागायत प्रज्वलित असलेल्या धुनीमुळे चेतना लाभलेली ‘द्वारकामाई’ - ही मूक वास्तू - आता बोलणार आहे...