साहित्यशास्त्र : स्वरूप आणि समस्या या पुस्तकात ‘साहित्य’ या संकल्पनेची व्यामिश्रता व वादग्रस्तता लक्षात घेऊन मांडणी केली आहे. या व्यामिश्रतेची व वादग्रस्ततेची कल्पना विद्यार्थ्यांना यावी, या गोष्टींमुळे साहित्याच्या संदर्भात निर्माण होणार्या विविध प्रश्नांचे, वादांचे भान त्यांच्यामध्ये निर्माण व्हावे, असा प्रयत्न येथे केला आहे. असे भान त्यांच्यात निर्माण झाले, तर साहित्याच्या संदर्भातील अनेकविध प्रश्नांचे सविस्तर, सखोल आकलन त्यांना होऊ शकेल. अशा प्रकारच्या कोणत्याही मांडणीमागे साहित्याविषयीची एक विशिष्ट भूमिका क्रियाशील असते, तशी ती येथेही आहे, हे आवर्जून नमूद करावयास हवे. यापेक्षा वेगळी साहित्यविषयक (व पर्यायाने जीवनविषयक) भूमिका असणार्या अभ्यासकाची प्रस्तुत विषयाची मांडणी भिन्न स्वरूपाची असू शकेल, याची कल्पना आहे. येथे अपरिहार्यपणे एका विशिष्ट भूमिकेतून जरी मांडणी झालेली असली, तरी इतर भूमिकांनाही येथे योग्य तो वाव दिला आहे. कवी व समीक्षक म्हणून प्रसिद्ध असणारे डॉ. वसंत पा.णकर हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. विजनांतील कविता (१९८३) हा काव्यसंग्रह आणि कविता : संकल्पना, निर्मिती आणि समीक्षा(१९९५) हा काव्यसमीक्षापर लेखसंग्रह ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. यांखेरीज त्यांनी अनेक समीक्षात्मक पुस्तके स्वतंत्रपणे व सहकार्याने संपादित केली आहेत. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक चर्चासत्रांमध्ये त्यांनी आपले शोधनिंबधही सादर केले आहेत.