स्त्री-पुरुष संबंध, कामाधीनता, विषयोपभोग, यांतून कधी धर्मकार्य घडत गेले तर कधी धर्मबाह्य गोष्टीही. प्राचीन भारतीय संस्कृतीत विवाहाचे आठ प्रकार मानले गेले. त्यापैकी काही प्रकार श्रेष्ठ तर काही प्रकारांना अजिबात प्रतिष्ठा नव्हती. अशा अप्रतिष्ठीत विवाहप्रकारातून तत्कालीन समाजव्यवस्थेत काही अनर्थ घडल्याची उदाहरणे सापडतात. रामायण-महाभारत ही महाकाव्ये याला अपवाद नाहीत. ‘रामायण - महाभारतातील कामदेवाचे बळी’ या ग्रंथात केवळ कामपीडित कथा नाहीत, तर अशा अनर्थातून या दोन महाकाव्याला वेगळे संदर्भ व परिमाण मिळत गेले. तसेच ही महाकाव्ये वाचताना वाचकांच्या मनात काही नैतिक प्रश्न निर्माण होतात, त्याचा उलगडा या पुस्तकांतून होण्यास मदत होईल.