नागनाथ कोत्तापल्ले हे गेल्या चाळीस वर्षांपासून मोजकेच पण लक्षणीय कथालेखन करीत आहेत. ‘राजधानी’ हा त्यांचा पाच दीर्घकथांचा संग्रह. या कथा वेगवेगळ्या वाटत असल्या तरी त्या एकाच वास्तवाच्या आविष्कार आहेत. आपल्या भोवतीचे कठोर आणि करुण वास्तव, सरंजामी परंपरा आणि आधुनिक मूल्यसरणी यांच्यातील संघर्ष, सनातन मानवी वृत्ती-प्रवृत्ती आणि श्रेष्ठतर मूल्ये यांच्यातील संघर्ष, अशी अनेक सूत्रे येथे सापडतील. अनेक व्यक्ती आणि घटनांमधून जीवनाचा एक व्यापक पट प्रत्येक कथेत उलगडत जातो.वास्तवाला थेटपणे भिडण्याचे सामर्थ्यही त्यांच्या कथेमध्ये आहे. त्यामुळे त्यांची कथा वर्तमान आणि प्रस्थापित व्यवस्था या संबंधीचे असंख्य मूलभूत प्रश्न उपस्थित करते आणि कथेला चिंतनशीलतेचे परिमाणही प्राप्त होते. व्यापक जीवनपट, अनोखे जीवनदर्शन, वास्तवाला थेट भिडण्याची वृत्ती आणि चिंतनशीलता यामधून नागनाथ कोत्तापल्ले यांची कथा वाचकांना जीवनाचे एक नवेच भान देते. किंबहुना हेच त्यांच्या कथेचे सामर्थ्य आहे.