प्रतिभा आणि सर्जनशीलता या दोन संज्ञा निसर्ग आणि मानवी मनोव्यवहाराशी निगडित आहेत. या दोन्हींचे शास्त्रज्ञ व कलावंतांना कमालीचे आकर्षण आहे.‘प्रतिभा’ हा शब्द व्यवहारात वापरला जातो. साहित्यातच नव्हे तर, साहित्येतर कार्यातही तो वापरला जातो. प्रतिभा नेमकी येते कुठून?ती उपजत असते की, कष्टसाध्य आहे? की, ही नैसर्गिक देणगी आहे? नवनिर्मितीसाठी प्रतिभेला अभ्यासाची जोड द्यायला हवी का? की, केवळ अभ्यासाने कलानिर्मिती शक्य आहे? यासारखे प्रश्न कुतूहलापोटी मनात येतात. कलेच्या सर्वच क्षेत्रांत या प्रश्नांची चर्चा केली जाते. किंबहुना हे कुतूहल न शमणारे आहे, म्हणूनच त्यावर सतत चर्चा होत राहते.या औत्सुक्यातूनच काही अभ्यासकांनी ‘प्रतिभा, कलानिर्मिती आणि कलाभ्यास’ यांच्यातील संबंधाचा घेतलेला हा शोध मराठी कलासमीक्षेच्या क्षेत्रात मोलाची भर घालणारा आहे.