श्री. वि. स. खांडेकरांनी लिहिलेल्या एकोणीस कथांचा हा अगदी अलीकडचा संग्रह. दुसया महायुद्धानंतरच्या आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात आपल्या सभोवताली होत असलेल्या भौतिक प्रगतीच्या घोडदौडीत आत्मिक मूल्यांचा कसा चोळामोळा होतो आहे, नकळत ही क्रिया आधुनिक समाजातही कशी सुरू होते आहे, याची साक्ष गेल्या काही वर्षांतले आपले राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि कलात्मक जीवन देत आहे. मानवी सुखी जीवनाच्या अंतिम कल्पनेत भाकरीइतकेच आत्म्याला, शारीरिक स्वास्थ्याइतकेच मानसिक शांतीला आणि वैयक्तिक विकासाइतकेच सामाजिक प्रगतीला महत्त्व आहे. मात्र भौतिक सुखसमृद्धीच्या मागे लागलेल्या समाजाला, जीवनाला आधारभूत असलेल्या मूल्यांची कदर उरलेली नाही. अशा विचित्र परिस्थितीत, आर्थिक आणि आत्मिक मूल्यांची सांगड घालण्याचे काम विचारवंतांना, द्रष्ट्या समाजसुधारकांना आणि साहित्यिकांना करावे लागणार आहे. या संग्रहात संग्रहित केलेल्या कथांमधून याच जीवनमूल्यांची पाठराखण जीवनवादी श्री. खांडेकर यांनी केवढ्या कलात्मक कौशल्याने केलेली आहे, त्याची प्रचिती वाचकांना येईल.