निसर्गरम्य गोव्याच्या पाश्र्वभूमीवर आजवर अनेकानेक कादंबऱ्या प्रसिद्ध झालेल्या आहेत; परंतु गोव्यातील समकालीन समुह-जीवनाचं यथायोग्य चित्रण करणारी ही पहिलीच कादंबरी आहे. भाषा, वंश, धर्म, चालीरीतींनी आणि भिन्न जीवनशैलींनी बध्द अशा अनेकानेक व्यक्ती तुम्हांला या कादंबरीत भेटतात. त्यांचे आपापसांतील संबंध, संघर्ष, त्यांचे भावना-विचारांचे कल्लोळ, त्यांच्यातील विहित-अविहित नाती, औरस-अनौरस संबंध यांचं सिध्दहस्त लेखणीनं केलेलं चित्रण पाहून वाचक केवळ स्तिमित होईल. या कादंबरीचं उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे तिचा आकृतिबंध हे आहे. पारंपारिक सर्वमान्य असा आकृतीबंध न निवडता, कादंबरीच्या प्रकृतीनं स्वत:च स्वत:साठी घडवलेला हा आकृतिबंध लेखिकेच्या सर्जनशक्तीच्या विस्तृत परिघाचं मनोज्ञ दर्शन घडवतो. महालक्ष्मी आणि सरस्वती या दोन देवींचं वास्तव्य असलेल्या आणि निसर्गदत्त सौदर्यानं नटलेल्या गोव्याच्या पाश्र्वभूमीवरची व्यामिश्र समाजजीवन यथार्थपणे चित्रीत करणारी ही समर्थ कादंबरी वाचकाला अस्वस्थ करुन सोडील!