खरे म्हणजे, एड्स ही रोग-संज्ञा परिचित असलेल्या बहुसंख्य लोकांना त्याची व्याप्ती आणि हाहाकार माहीत नाही. अज्ञानामुळे गैरसमज, गैरसमजांमधून नफरत, नफरतीतून नव-अस्पृश्यता, त्यातून समाजात येणारे तुटकेपण, त्यामुळे येणारे औदासीन्य व त्याचबरोबर प्रकटणारी असंवेदनक्षमता आणि अनेकदा क्रौर्यही - अशी ती भयानक साखळी आहे... शहरीकरणाची प्रक्रिया आणि ग्रामीण जीवन उजाड करणारी स्थिती या दोन्हीचा एड्सच्या प्रसाराशी संबंध आहे. म्हणजेच स्थलांतरितांचा प्रश्न असो वा वेश्याव्यवसायाचा, कुटुंब विस्कटल्याचा प्रश्न असो वा लहान मुलांना जन्मतःच एचआयव्ही असण्याचा, दारिद्र्य व त्यातून उद्भवणारी लाचारी व हिंसा यामुळे स्त्रियांचे जीवन उद्ध्वस्त होण्याचा प्रश्न असो वा मनाने विषण्ण झालेल्या पुरुषाचा (वा तरुण मुलाचा)- अशी एकही मनःस्थिती, कुटुंबस्थिती, समाजस्थिती व अर्थस्थिती नाही, की जी ङङ्गएड्स'शी निगडित नाही, म्हणजेच एड्सचे सर्वार्थाने जागतिकीकरण झाले आहे. शेखर देशमुख यांनी या विदारक जगतिकीकरणाचा खर्या अर्थाने वैश्विक वेध घेतला आहे. कुमार केतकर