अपहरणाचे ८१ दिवस
जीवन-मृत्यू, चिंता-भय, आशा-निराशा, अंधार-गूढता अशा अनेक संकटांनी भरलेले ते दिवस. पुढच्या क्षणी काय होणार आहे, याची कल्पना नाही. फुलपाखरांच्या वाटेवरचा रम्य प्रवास अचानक थांबला आणि दहशतवाद्यांच्या मगरमिठीत सापडला. आता सुटकेचा मार्ग अनिश्चित झाला आणि घराच्या, कुटुंबीयांच्या आणि सर्वांच्याच आठवणीनं मन व्याकूळ होऊ लागलं. घरी तरी काय वेगळे घडत असणार, हा विचार आतून पोखरत होता. दहशतवाद्यांबरोबर मुक्कामाचे ठिकाण बदलत होते. लष्कराला चकवा देण्यासाठी त्यांची ही खेळी होती; पण चुकून मला सोडवायला आलेल्या सैनिकांची गोळी कदाचित...
काहीही अशक्य नव्हतं! उंच डोंगरावरून कोणीतरी खाली फेकण्याची, महापुरासारख्या प्रचंड वेगानं वाहणार्या नदीत शेवट होण्याची किंवा दगड, गोळी किंवा कशानेही शेवट होण्याची शक्यता होती.
फुलपाखरांचा अभ्यास करायला गेलेला एक सहृदयी माणूस आणि अपहरणकर्ते यांच्यातले अंतर, संशय कमी झाला. अपहरणकर्त्यांच्या मनातला राग, तिरस्कार कमी होऊ लागला आणि पुन्हा जीवनाचा मार्ग प्रकाशमय झाला. ही कथा केवळ अपहरणकथा नाही. ही कथा आहे एका अभ्यासकाच्या शोधयात्रेची, त्या यात्रेतील महाविघ्नाची आणि पुन्हा फुलपाखरांच्या जगात परतण्याची.