राष्ट्रवादी आणि देशभक्त यांच्याही पूर्वीच्या, वसाहतवादी आणि घुसखोर यांच्याही पूर्वीच्या, सम्राट आणि राजे यांच्याही पूर्वीच्या अशा भारताचे ‘वस्त्र’ तीर्थयात्रेच्या मार्गरूपी धाग्यांनी विणले गेले होते. आत्मज्ञानाच्या शोधार्थ बाहेर पडलेले साधक आणि ऋषिमुनी उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम असे पर्वत ओलांडून, नद्यांच्या काठाकाठाने कृत्रिम सीमांकडे दुर्लक्ष करत देवाच्या शोधार्थ फिरायचे. विख्यात पौराणिक-कथाकार देवदत्त पट्टनायक या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला अशाच 32 तीर्थक्षेत्रांच्या अंतर्दृष्टी देणार्या प्रवासाला नेत आहेत. या तीर्थस्थळांतील पुरातन आणि आधुनिक देव-देवतांच्या माध्यमातून ते आपल्याला गुंतागुंतीचा आणि अनेक थरांनी मिळून बनलेला इतिहास व भूगोल उलगडून सांगत आहेतच; पण त्याचबरोबर एके काळी जंबुद्वीप (गडद रंगाच्या जांभळांचा प्रदेश) म्हणून ओळखल्या जाणार्या या भूमीतील कल्पनाशक्तीदेखील उलगडून दाखवत आहेत.