मोपांसा हा फ्रेंच साहित्यातील एक अद्वितीय लघुकथाकार. पण तो केवळ श्रेष्ठ कथाकारच नव्हता, तर सुप्रसिद्ध फ्रेंच कादंबरीकार फ्लोबेरला गुरुस्थानी मानणारा, त्याचं मार्गदर्शन लाभलेला एक उत्कृष्ट कादंबरीकारही होता. इ.स. १८८८ मध्ये प्रथम प्रकाशित झालेली त्याची पिएर ऍण्ड जॉन' ही कादंबरी पिएर आणि जॉन या दोन भावांच्या नातेसंबंधातील गुंतागुंत उलगडून दाखविणारी विलक्षण कहाणी आहे. दोघांचे स्वभाव भिन्न आहेत. पिएर चिडखोर, भावनावश होणारा आणि संवेदनशील आहे, तर जॉन शांत व संयमी. पहिल्यापासून दोघांमध्ये सतत एक विलक्षण स्पर्धा आहे. ती जशी त्यांच्या आपल्या आईशी असणार्या नातेसंबंधात आहे, तशीच दोघांनीही एकाच तरुणीवर प्रेम करण्यातही आहे. दोघा भावांतील संशय आणि मत्सर आणि त्यात होरपळणारी त्यांची आई यांची ही जीवनकहाणी मोपांसानं आपल्या नितळ, सुस्पष्ट आणि आशयाशी थेट भिडणार्या धारदार भाषाशैलीत कौशल्यानं गुंफली आहे. दोघा भावांतील समर प्रसंग आणि मानसिक कल्लोळ यांचं अत्यंत प्रभावी दर्शन त्यानं घडविलं आहे. त्यातील मनोविश्र्लेषणाची ताकद नि बारकावे टिपण्याचं त्याचं सामर्थ्य आजही आपल्याला थक्क करून सोडतं.' पिएर ऍण्ड जॉन' ही कादंबरी फ्रेंच मनोविश्र्लेषणात्मक कादंबरीच्या परंपरेतील एक महत्त्वाचा टप्पा समजला जाते