विज्ञानाला सीमा नाही. आज केवळ कल्पनेत असलेल्या अनेक गोष्टी उद्या साकार होतात. केवळ कल्पना म्हणून कोणतीही गोष्ट नाकारण्यात शहाणपणा नसतो. काळाच्या गर्भात काय काय दडलेले आहे, याचा आज थांग लागत नाही; कारण उद्या सर्वस्वी नवीन असतो. आज नेहमीच उद्याचा पाठलाग करीत असतो.काळाशी स्पर्धा करीत असा पाठलाग सुरू होतो तेव्हा मग मानवी भावभावनांचे विश्वही हादरून जाते. मानवी संस्कृती उद्याच्या दिशेने धावायला लागते, तेव्हा आजच्या पावलाखाली काल तुडविला जातो. कालपर्यंत ज्याना डोक्यावर घेऊन नाचत होतो अशा अनेक गोष्टी, संस्कार आणि विचार आज पायदळी तुडविले जातात; कारण उद्याचे आकर्षण खूप मोठे असते.उद्याच्या उदरात काय दडले आहे याचा शोध घेण्यात असतो थरार, उत्साह आणि काळजाला घर पाडणारी एक अनामिक भीती भीती आणि थरार यांच्या मिश्रणातून उदयाला येते उत्कटता. पुढे काय. पुढे काय? ही अपेक्षाच उत्कटतेच्या मळाशी असतेआपल्याला अपेक्षित नसलेल्या, आपण कल्पनाही न केलेल्या घटना एकापाठोपाठ वेगाने घडत जातात तेव्हा मनातल्या उत्कटतेचे रहस्यात रूपांतर होते.अशाच उत्कंठावर्धक आणि अकल्पित, रहस्यमय घटनांचा थरार असलेली नारायण धारप यांची कादंबरी.