समीक्षक दभिंची कीर्ती त्यांच्या ठिणगीसारख्या वाङ्मयीन टिपणांसाठी आहे. खूप दिवसांनंतर दभि आता पुन्हा अशा टिपणांकडे वळले आहेत. ही खरोखरच मराठी रसिकांना त्यांना दिलेली पस्तुरी आहे. या लेखनसंग्रहात प्रतिभा, निर्मितीप्रक्रिया, आस्वादप्रक्रिया इत्यादी कलाप्रक्रियांचे तात्त्विक पण अनौपचारिक, चिंतनशील आणि प्रतीतिनिष्ठ विवेचन आहे; रेव्हरंड टिळक, कुसुमाग्रज, गदिमा, पु. शि. रेगे, मर्ढेकर इत्यादी श्रेष्ठ कवींच्या काव्यकृतींचा समीक्षागर्भ अस्वादही आहे.
याशिवाय आचार्य अत्रे, आनंदीबाई शिर्के, सी. रामचंद्र, माधवी देसाई,कुमार सप्तर्षी यांच्या आत्मचरित्रांच्या निमित्ताने आत्मचरित्र या लेखनप्रकाराचे नवे आकलन दभिंनी येथे सादर केले आहे.
मध्येमव्यायोग, एडिपस रेक्स, रात्रीचा दिवस, कैरी, भोवरा, दूत, गंगार्पण अशा अक्षर साहित्यकृतींचीही नवी आकलने इथे लेखकाने सादर केली आहेत. सौंदर्यशास्त्र आणि ललित गद्य यांना आत्मसात करून हे समीक्षालेखन प्रकटले आहे. ‘पस्तुरी’चे हे वैशिष्टय आहे.