…भूक लागल्यानंतर नामदेव एका खानावळी तंबूत शिरला. आत तंबूत प्रचंड गोंगाट होता. गोंगाट करणं अन् गोंगाटात जगणं हीच मानवाची प्रमुख संस्कृती आहे, असं नामदेवला वाटून गेलं, म्हणून तर आपल्या समाजात कुणाचा जन्म झाला तरी गोंगाट होतो आणि कुणी मेलं तर गोंगाटाशिवाय पर्यायच नाही. संपूर्ण आयुष्यातले अनेक गोंगाट या जन्म-मृत्यूच्या दोन ठळक गोंगाटाभोवती फिरणारे आहेत – जन्मतःच रेडिमेड नातेवाईक आपत्याला मिळतात. त्यांच्याशी जन्मभर वेगवेगळ्या भूमिकांवरून आपण व्यवहार करतो.‘आयुष्यात नेमकं काय करावं? टाईमपास कसा करावा? हा प्रश्न मनुष्याला कधी पडत नाही, ह्याचं कारण आजूबाजूला कधी नातेवाइकांचा तर कधी इतर संबंधितांचा गोंगाट सुरू असतो.आपण येण्यापूर्वीही हा गोंगाट होता अन् गेल्यानंतरही राहील. त्यामुळे अगोदरच चाललेल्या या गोंगाटात आपलाही थोडासा गोंगाट मिसळवून निघून जाणे हेच मानवी जीवनाचं सूत्र आहे, असं त्याला वाटलं…(कादंबरीतून…)